Thursday 14 September 2017

Posted by samirsinh dattopadhye on 03:02 No comments

संकटे कोणाला टळली आहेत? ज्याला त्याला आपापल्या प्रारब्धाप्रमाणे विविध संकटांशी सामना करावाच लागतो. पण बापूंच्या छत्रछायेखाली असलेल्या श्रद्धावानांचा हा नेहमीचा अनुभव आहे की संकटात त्यांना आपोआप मनःसामर्थ्य मिळत जाते, आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध होत राहते. इतकेच नव्हे, तर संकटामध्ये जर नुकसान झाल्यासारखे वाटले, तर त्यातूनही कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांचा फायदाच झालेला असतो.
- शरद पाटील, नंदुरबार
 
गेली काही वर्षे बोअरवेलचे पाणी खूप कमी झाल्यामुळे मला शेतीत दरवर्षी खूप नुकसान होत होते. पुढे २००१ पासून बापूंच्या छत्रछायेत आलो. इतर बापूभक्तांना आलेले बापूंच्या कृपाप्रसादाचे अनुभव वाचत, ऐकत होतो. काही दिवसांपूर्वी ‘कृपासिंधु’ मासिकात आलेल्या एका भक्ताचा अनुभव माझ्या पत्नीने वाचला व ती मला म्हणाली की ‘‘त्या भक्ताने बापूंचे पादुकापूजन केले होते. त्या पादुकापूजनाचे जे निर्माल्य निघाले होते ते त्यांनी त्यांच्या कोरड्या विहिरीत टाकले आणि काय आश्चर्य, एवढे महिने ठणठणीत कोरडी असणार्‍या त्यांच्या विहिरीला चक्क पाणी आले.’’
हा अनुभव ऐकून मलाही माझ्या अशाच तर्‍हेच्या समस्येबाबत हुरूप आला.

पुढे मार्गशीर्ष महिन्यातल्या ‘सच्चिदानंदोत्सवात आम्हीही पादुका घरी आणल्या. छानपैकी पूजन झाले. माझ्या मनात त्या बापूभक्ताचा अनुभव होताच. पूजन झाल्यावर दुसर्‍या दिवशी आम्हीदेखील त्या पादुकांना अर्पण केलेल्या फुलांचे निर्माल्य आमच्या कोरड्या विहीरीत टाकले. विहीरीजवळच बोअरवेल आहे. हे करताना मी मनोमन बापूंची प्रार्थना केली, ‘बापू, खरं तर ही मी माझ्याच वाईट प्रारब्धाची फळे भोगत आहे आणि तरीदेखील तुम्हाला विनवतो आहे, तुम्हाला त्रास देत आहे.’

परंतु काही केल्या बोअरवेलमध्ये मोटर टाकून पाणी टेस्ट करण्याची हिम्मत होत नव्हती. थोड्या दिवसांनी माझ्या मुलाने बोअरवेलमध्ये मोटर टाकून पाहिली तर बापुकृपेने बोअरचे पाणी आधीपेक्षा खूपच चांगले निघाले.

....आणि ह्यानंतर तर आमच्या जीवनात बापूंच्या अनुभवांची शृंखलाच सुरू झाली. जीवनामध्ये अडचणी कोणाला चुकल्या आहेत? तशा त्या आम्हालाही येतात, पण आता ‘बापू आपली काळजी घेणार’ हे माहीत असल्यामुळे अडचणींशी झुंजताना पूर्वीसारखे हतबल वाटत नाही.

तसे पाहिले तर मी एक सामान्य शेतकरी आहे. ऑक्टोबर २०११ मध्ये आपल्या अधिवेशनासाठी आम्ही पतीपत्नी मुंबईला आलो असता, अधिवेशनादरम्यानच माझ्या मुलाचा फोन आला की ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे आपला मोटर पंप बंद आहे.

मुलाचा फोन ऐकून मला खूप टेन्शन आले. ‘हे काय होऊन बसले, आता कसे होणार’ असा विचार माझ्या मनात घर करून राहिला. ऑक्टोबर हीट चालू असल्यामुळे पपईच्या पिकाला पाणी देणे खूपच आवश्यक होते व ऐनवेळी पिकाला पाणी न मिळणे म्हणजे आम्हाला खूप नुकसान होणार होते. आधीच पाणी द्यायला उशीर झाला होता व त्यात हे संकट ओढवले!

पण तितक्यात माझ्या मनात विचार आला की संकटापेक्षा माझा सद्गुरू मोठा आहे....नक्कीच. मग आपण घाबरतोय कशाला? असा निश्‍चय करून थोड्या वेळाने मी रिलॅक्स झालो.

मनोमन बापूंना म्हणालो, ‘बापू, आता तुम्ही शेतात पाऊस पाडता की आणखी काही जादू करता....तारणे की मारणे सर्व तुमच्या हातात आहे.’

अधिवेशन संपल्यावर घरी आलो, तेव्हा शेजारील शेतकरी घरी येऊन मला सांगू लागला की माझ्या शेतात तुमचे पाणी फुटले आहे; पेरणीसाठी मला अडचण येईल, तरी तुम्ही ते पाणी प्रथम बंद करा.

पाणी? आणि माझ्या शेतातून? कसे शक्य आहे? आमचा मोटरपंप तर बंदच होता.

‘‘कदाचित दुसर्‍या कोणाचीतरी पाईपलाईन लीक असेल, कारण ४-५ दिवसांपासून माझी मोटर बंदच आहे’’, असे मी त्याला सांगितले.

पण नंतर मुलाला विचारले तर त्याने भीत भीत सांगितले की मी मोटर चालू करून पाहिली तर कशी कोण जाणे, पण मोटर चालू झाली व हळूहळू का होईना, पिकाला पाणी मिळाले.
पण ट्रान्सफॉर्मर जळला असताना मोटर चालू होईलच कशी? हे काय गौडबंगाल! ह्याबद्दल वायरमनला विचारले. त्यानेही तेच सांगितले की हे शक्यच नाही. ट्रान्सफॉर्मरशिवाय मोटर चालूच शकत नाही व तसा प्रयत्न केल्यास मोटरपंप खराब होऊ शकतो.

ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे आजूबाजूच्या कुणाही शेतकर्‍याने मोटर चालू केली नव्हती व नवीन ट्रान्सफॉर्मर एक महिना मिळू शकणार नव्हता. ‘‘मोटर खराब झाली असती तर तुम्ही मला रागवणार ह्या भीतीने मी तुम्हाला सांगितले नाही व मोटर चालू ठेवली’’ असे माझ्या मुलाने सांगितले.

हे सर्व ऐकून मी खूपच भारावलो. माझी सगळी चिंता बापूंनीच दूर केली. ट्रान्सफॉर्मरशिवाय मोटर चालत असूनही मोटर खराब झाली नाही. शिवाय नवीन ट्रान्सफॉर्मरही ८ दिवसांतच मिळाला.
अजून अनुभव संपला नाही. बापूंच्या छत्रछायेत असताना श्रद्धावानावर जी संकटे येतात, तीदेखील त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदाच करून जातात, हे आम्ही अनुभवले.
त्याचे झाले असे की ह्या सर्व गडबडीत थोडा पाण्याचा ताण बसल्यामुळे पपई उशीरा निघणार होती. पण म्हटले उशीरा तर उशीरा, पपई वाचली तरी, असे म्हणून आम्ही स्वतःचे समाधान करून घेतले. पण पुढे गोष्ट अशी झाली की ज्या शेतकर्‍यांची लवकर पपई निघाली, त्यांना खूप कमी भाव म्हणजे फक्त दोन रुपये प्रति किलो प्रमाणे मिळाला. माझे धाबे दणाणले. मी बापूंना मनात म्हणालो, ‘बापू, एकतर भाव कमी, त्यात आमची पपई निघेपर्यंत तर खूपच भाव कमी होईल. पण त्यामुळे होणारे नुकसान सहन करण्याची शक्ती मला द्या.’
परंतु बापूंना आमचे नुकसान मान्य नव्हते!

जेव्हा आमची पपई निघाली तेव्हापासून बरोबर पपईचा भाव वाढला आणि आम्हाला चार रुपये प्रति किलो दराने भाव मिळाला आणि होणारे मोठेच नुकसान टळले.

अशी बापू आमच्यावर येणार्‍या संकटाआधीच, संकटनिवारणाचीही सोय करून ठेवतात.

॥ हरि ॐ ॥

Categories:

0 comments:

Post a Comment