Monday 4 September 2017

Posted by samirsinh dattopadhye on 04:03 No comments


 जेव्हा आपण - ‘माझ्या आयुष्यात जे काही होणार, ते सद्गुरुराया, तुझ्याच इच्छेने’ अशी मनोभूमिका ठेवतो, तेव्हा तो आपल्याला भरभरून देतो’, हा बापुभक्तांना नित्य येणारा अनुभव आहे. हा अनुभव कथन केलेली श्रद्धावान स्त्री प्रथम बापूभक्त नव्हती. तिला बापूभक्तीत असणारे सासर मिळाले. सासरच्यांचे पुरोगामी विचार बघून हळूहळू तिचीही बापूंवर श्रद्धा बसत गेली. पुढे तिच्या आयुष्यात जेव्हा एक वादळ आले, तेव्हा तिच्या सासरचे लोक - ‘जे काय होईल ती बापूंची इच्छा’ असे म्हणून तिला आधार देण्यास तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
अशा श्रद्धावानांना बापू टाकेलच कसा?
 - प्राजक्ता कुळकर्णी, भुसावळ
माझ्या आयुष्यातला बापूंचा हा सुंदर अनुभव. डिसेंबर २००९ मध्ये माझे लग्न झाले. सासर भुसावळ येथे असून सासरचे सर्वजण बापूभक्त आहेत. माझे मिस्टर औरंगाबाद येथे जॉब करत असल्यामुळे आम्ही दोघेच औरंगाबाद येथे रहात होतो. मला लग्नापूर्वी बापूंबद्दल काही माहिती नव्हती.

लग्न होऊन काही महिन्यांतच मला दिवस गेले. डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेलो. मात्र चेकअपचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की ‘‘पोटात गाठ असल्यामुळे अ‍ॅबॉर्शन करावं लागणार.’’ हे ऐकून आमचे धाबे दणाणले. घरातील मोठी सून असल्यामुळे पहिलंच बाळ घरात येणार या आनंदात घरचे सगळे होते, पण हे ऐकून त्या आनंदावर विरजण पडणार होते. आता सासरी काय व कसे सांगणार आणि ते हा धक्का कसा सहन करतील ह्या विचारात मी पडले.

डॉक्टरांच्या मते आमच्याकडे विचार करण्यास २-३ आठवड्यांचा कालावधी होता. त्यादरम्यानच दिवाळी असल्यामुळे दिवाळी झाल्यावर अ‍ॅबॉर्शन करण्याचे ठरवून आम्ही दिवाळीकरिता भुसावळला आलो व मन घट्ट करून घडलेला सर्व प्रसंग सासू सासर्‍यांना सांगितला व आता काय प्रतिक्रिया येईल त्याची वाट बघत बसलो. पण सुदैवाने माझ्या सासरची माणसे कट्टर बापूभक्त आहेत आणि ‘श्रद्धावानांच्या जीवनात जे काही होते ते सद्गुरुंच्या इच्छेने’ ह्या मतावर ठाम असतात. त्यामुळे बापूंनीच हा आघात सहन करण्याची शक्ती त्यांना दिली. त्यामुळे हे ऐकल्यावर घरच्या सार्‍यांना दुःख जरी झाले असले तरी कुठलीही आक्रस्ताळी प्रतिक्रिया उमटली नाही. सासरे फक्त - ‘आता जे होणार ती बापूंची इच्छा’ एवढेच म्हणाले.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझे दीर मुकेशसिंह कुळकर्णी यांनी आमच्या घरी परमपूज्य बापूंचे पादुकापूजन आयोजित करवून, ते आम्हां दोघांकडून करून घेतले. तेदेखील हेच म्हणाले की ‘बापू जे योग्य ते नक्की करतील. ते आहेतच आपल्यासोबत!’ ह्या अशा प्रतिक्रियेमुळे, मनाला दुःख जरी झाले असले तरी टेन्शन दूर झाले होते.

दिवाळीनंतर आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो व त्यांच्याशी ऑपरेशन संदर्भात चर्चा केली. डॉक्टरांनी पुन्हा एकदा चेकअप केले. रिपोर्ट आला.

तो वाचून डॉक्टरांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना! ते पुन्हा पुन्हा रिपोर्ट वाचत होते. त्यांनी पुन्हा खात्री करून घेण्यासाठी माझ्या मिस्टरांना विचारले, ‘‘तुम्ही मधल्या काळात काही ट्रीटमेंट अथवा ऑपरेशन केलेत का? कारण आधीच्या रिपोर्टमध्ये दिसत असलेली गाठ आता नाहीशी झाली आहे आणि पोटातला गर्भसुद्धा व्यवस्थित आहे. त्यामुळे आता तुम्ही बाळाला जन्म देऊ शकता. अ‍ॅबॉर्शनची काहीच आवश्यकता नाही!’’

हे ऐकून आम्हा दोघांना झालेला आनंद अवर्णनीय होता. ‘मी तुला कधीच टाकणार नाही’ ही बापूंनी सर्व श्रद्धावानांना दिलेली ग्वाही माझ्या बाबतीत खरी करून दाखवली होती.

खरंच, मातृत्वाचे सुख मी बापूंच्या कृपेने अनुभवू शकले.

यथावकाश डिलिव्हरी होऊन मला मुलगा झाला.

आता माझा मुलगा ‘श्‍लोक’ २ वर्षाचा झाला आहे व पूर्णपणे निरोगी आहे. आमच्यासमोर हा बापूंच्या कृपेचा अनमोल ठेवाच आहे. खरंच,

एक विश्‍वास असावा पुरता
कर्ता हर्ता गुरु ऐसा

ही खूणगाठ मनाशी बांधली की तो सद्गुरु मग आपल्याला सगळ्यातूनच तारून नेतो.
आम्हां सर्वांकडून बापूंची भक्ती आणि सेवा अखंड घडो, हीच बापुचरणी प्रार्थना!

॥ हरि ॐ ॥

Categories:

0 comments:

Post a Comment