Friday 8 September 2017

Posted by samirsinh dattopadhye on 04:03 No comments
Aniruddha-Bapu-Anubhav-Kathan

श्रद्धावानांच्या मनातील सर्व उचित, पवित्र इच्छा ते सद्गुरुतत्त्व पूर्ण करतंच, असा श्रद्धावानांचा अनुभव आहे. आणि एकदा एखाद्या श्रद्धावानाच्या मनातील एखादी उचित, पवित्र इच्छा पूर्ण व्हावी असा ‘संकल्प’ त्या ‘सत्यसंकल्प’ सद्गुरुंनी केला की मग ती इच्छा पूर्ण होण्याच्या आड येणार्‍या अनेक गोष्टी मग आश्‍चर्यकारकरित्या आपोआप बाजूला होतात.
- सेजलवीरा भट, नंदुरबार 



‘तू’ आणि ‘मी’ मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीही नाही....हे श्रद्धावानाला दिलेलं वचन बापू पाळतोच पाळतो. याची प्रचिती देणारा हा अनुभव बापू चरणी अर्पित करते.

परमपूज्य बापूंना ‘सुंदरकांड’ आवडतं. रामायणातील ह्या सर्वांत सुंदर भागाचे रसग्रहण श्रद्धावानांनाही करता यावे ह्याकरिता बापूंनी आपल्या ‘दैनिक प्रत्यक्ष’ मधून सुंदरकांडावर मराठीतून ‘तुलसीपत्र’ ही अग्रलेखमालिकाही मराठी व हिंदीतून चालू केली. म्हणून आपणही बापूंचे पादुकापूजन करून, त्यासमवेत सुंदरकांड पठणासहित बापूंचं गुणसंकीर्तन करावं अशी इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली. याविषयी मी आमच्या इथल्या अनिरुद्ध उपासनाकेंद्रातील काही महिलाभक्तांनाही सांगितलं. त्यांनाही माझा हा विचार खूप आवडला. पण पुढे प्रश्न होता - हे सर्व होणार कसं आणि कधी ?

हा विचार करत अनेक दिवस गेले. अखेर श्रावण सुरू झाला आणि सोबत दरवर्षीप्रमाणे सर्व भक्तांकडे साखळी पादुकापूजन करण्यास सुरुवात झाली. मी मात्र हा सगळा कार्यक्रम एकदम करायचा असल्याने ह्या साखळी पादुकापूजनाकरिता नाव दिले नाही. पण आता माझ्या मनात असलेल्या इच्छेने आणखीनच जोर धरला होता. अर्थात मिस्टर कितपत राजी होतील, ही शंकादेखील होतीच. असो, जे काय होईल ते बापूंच्याच इच्छेने अशी मी मनाची समजूत काढली.

एक दिवस रात्री हे सर्व बापूंशी मनात बोलता बोलता झोपून गेले. सकाळी जाग आली ती कानावर पडलेल्या एका भजनाच्या आवाजाने. उठून खिडकीतून बाहेर पाहिलं तर एक साधु ते भजन गात होता. हा दिवस होता शनिवारचा. त्या साधुपुरुषाने ते भजन माझ्या घराच्या परिसरात बर्‍याच वेळपर्यंत म्हटलं व नंतर तो कुठे गेला कळलंच नाही. त्या भजनाने एक उभारी आल्यासारखं वाटलं. मनात जी मिस्टरांना सुंदरकांड व पादुकापूजनाविषयी सांगण्याची भीती होती ती जवळपास नाहीशीच झाली. फेश झाल्यावर मनाशी ठाम निश्‍चय करून त्यांना मी माझी कल्पना सांगितली....आणि काय आश्चर्य! त्यांनी सुंदरकांड व पादुका पूजन करण्यास होकार दिला व सुंदरकांड म्हणणार्‍या एका भजनी मंडळाच्या प्रमुखांशी बोलून वार, तारीख व खर्चाविषयी विचारपूस करण्यासाठी सांगितले. तेव्हा माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही. बापूंचे मी मनातल्या मनात आभार मानले. हे सर्व बापूच घडवत आहेत व सकाळी भजन म्हणणारा साधू पुरुष दुसरा कोणी नसून माझे ‘बापूच’ होते असा विश्‍वास मला वाटू लागला.

खरंच बापूराया, तू प्रत्येक भक्ताच्या मनातलं जाणतोसच जाणतोस!

मी ओळखीच्या एका व्यक्तीला सुंदरकांडाचे गायन करणार्‍या मंडळाची व त्यांच्या प्रमुखांची माहिती काढण्यास सांगितले. अशा एका मंडळाविषयी माहिती व त्यांच्या प्रमुखांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळताच मी त्यांच्याशी बोलले. पण ते म्हणाले, ‘‘आम्ही सुंदरकांड फक्त शनिवारी करतो व तेदेखील सायंकाळी ६.३० ते १०.०० ह्या वेळात.’’ शनिवारी सायंकाळी? आपल्या उपासनेच्या वेळेत? कसं शक्य होणार?

मग मी त्यांना आपल्या शनिवारच्या अनिरुद्ध उपासनेबद्दल सांगून, दुसरी वेळ देण्यास सांगितली. पण आपण शनिवारखेरीज अन्य दिवशी कार्यक्रम करत नसल्याचे सांगून, उलट आम्हालाच उपासनेचा दिवस बदलण्याविषयी त्यांनी सांगितले. ते अर्थातच शक्य नव्हते. काय करावे काही सुचत नव्हते. कार्यक्रम सोडून द्यावा लागणार की काय ह्या कल्पनेने मला खूपच टेन्शन आले. मग मनातून बापूंनाच हाक मारली. मनात बापूंचं नाव घेत मी त्यांना समजावून सांगितलं, ‘‘आम्ही शनिवारची उपासना चेंज नाही करू शकत. ते आमच्या हातात नाही. शनिवारची उपासना ही आमच्या सद्गुरु अनिरुद्ध बापूंकडूनच ठरलेली आहे.’’ असं सांगत त्यांना थोडक्यात बापूंची माहितीही सांगितली.

बापूंनी त्यांचे कार्य सुरू केले होते. ह्या माझ्या वक्तव्यानंतर त्या सत्संग प्रमुखांच्या मनात थोडी चलबिचल झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आले. त्यांना बापूंविषयी थोडीबहुत माहिती होती व आपल्या बापुपरिवाराबद्दल त्यांचे मतही चांगले होते.

त्यामुळे पुढे ते म्हणाले, ‘‘आज शनिवार आहे. द्वारकाधीश मंदिरात सुंदरकांडपठणाचा कार्यक्रम आहे. तुम्ही तेथे या. माझ्यासोबत जे इतर सहकारी आहेत, त्यांना विचारून सांगतो. तुम्ही त्यांना सर्व समजावून सांगा की ‘माझी तुमच्याकडून सुंदरकांडपठण करण्याची इच्छा असून त्या सोबतच आमच्या सद्गुरुंचे - परमपूज्य अनिरुद्धबापूंचे गुणसंकीर्तनही करायचे आहे. आमची सद्गुरु उपासना शनिवारीच व ६ ते ७ यावेळेत करणे अपेक्षित असल्यामुळे आम्ही काही केल्या आमची वेळ बदलू शकत नाही. तरी तुम्ही कृपया दुसरा वार देऊ शकलात तर मी आपली आभारी असेन.’ 

ठरल्याप्रमाणे मी संध्याकाळी आपली उपासना संपल्यावर द्वारकाधीश मंदिरात गेले व तेथे सुंदरकांडपठण करणार्‍या मंडळींसमोर माझी इच्छा व्यक्त केली.

....आणि काय आश्‍चर्य, अक्षरशः बापूंचीच लीला, त्या सहकार्‍यांनी मला दुसर्‍या वारासाठी होकार दिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तारीख ठरली रविवार दि. १९ ऑगस्ट २०१२. खरंच, अशक्य ते शक्य करविणारा माझा बापूच !!

हे कार्यक्रमाचे नक्की झाले, तर दुसरीच एक अडचण उभी राहिली. आमच्या भागात गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे मला, मिस्टरांना, घरच्यांना तसेच सुंदरकांडपठण करणार्‍या मंडळप्रमुखांना प्रश्‍न पडला की १९ तारखेलाही पाऊस  असाच सुरू राहिला तर प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल. परंतु बापुकृपेने प्रोग्रामच्या दोन दिवस अगोदर पाऊस थांबला आणि जोमाने तयारीला सुरुवात झाली.

१९ तारखेला राहत्या घरी सकाळी पादुकारूपातील बापूंना घरी आणले. पादुकापूजन झाले. संध्याकाळी ठरलेल्या वेळेवर सुंदरकांडपठणाला सुरुवात झाली. ह्यावेळेस बापूभक्त व नातेवाईक उपस्थित होते. श्रीरामांच्या, हनुमंताच्या फोटो मागे - ‘तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीही नाही’ ही सद्गुरुंची ग्वाही असलेला बॅनर लावलेला होता. का कोण जाणे, पण त्या ग्वाहीकडे सुंदरकांड म्हणणार्‍या मंडळप्रमुखाचे सारखे लक्ष जात होते. नंतर बोलताना मध्ये मध्ये अनेक वेळा त्यांनी या वाक्याचा - ‘किती सुंदर आणि शक्ती देणारं वाक्य आहे नाही’ - असा मोठ्या कौतुकाने उल्लेख केला व अनेकदा बापूंचा जयजयकारही केला. ठरल्याप्रमाणे सुंदरकांड संपल्यावर डॉ. प्रकाशसिंह झेंडे यांनी उपस्थितांसमोर बापूंचं गुणसंकीर्तन केलं. बापूंविषयी कुतूहल अनेकांच्या चेहर्‍यावरून, बोलण्यावरून दिसूनही आलं.

माझ्या मनासारखा, नितांत आनंद देणारा कार्यक्रम झाला होता....नव्हे, माझ्या बापूंनी माझी इच्छा जाणून तो करवून घेतला होता.

बापूंचे कार्य तेच करवून घेणार, ह्या सत्याची खूण पुढे अजून एकदा पटली. या पादुकापूजन-सुंदरकांडपठण-गुणसंकीर्तन कार्यक्रमासाठी साधारणतः ५०० लोकांना आमंत्रित केल्यामुळे महाप्रसादासाठी व्यवस्थाही तेवढ्याच अनुमानाने करण्यात आली होती. पण सुंदरकांडपठण सुरू झालं आणि लोकांची संख्याही वाढतच गेली.

पठणानंतर गुणसंकीर्तन झाल्यावर महाप्रसादास (जेवणास) सुरुवात झाली. पण उपस्थित श्रद्धावानांची संख्या जवळपास दुपटीने वाढल्याचे दिसत असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला प्रश्न पडला की आता कसं करावं?

म्हटलं आता बापूच काय ते बघतील. मग बापूंचे नाम घेत माझ्या आईला महाप्रसादात (जेवणात) उदी टाकण्यास सांगितलं. बापूंची कृपाच न्यारी.... चक्क ५०० ऐवजी जवळपास १ हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला....!!!

....श्रीराम, बापू! हे सर्वकाही शक्य झालं ते फक्त बापू, आई व दादांमुळेच !

बापूराया, अशीच सदैव तुझी कृपा आम्हां सर्व भक्तांवर राहो व कायम आम्हाला तुझ्या चरणांजवळ बांधून ठेवो हीच तुझ्या चरणांशी प्रार्थना.


॥ हरि ॐ ॥
Categories:

0 comments:

Post a Comment