Thursday 24 August 2017

Posted by samirsinh dattopadhye on 02:18 No comments
Anubhav Kathan Aniruddha Bapu - Jalgaon

आर्थिक परिस्थिती बेताची...त्यात अचानक घरात पडल्याचे निमित्त होऊन निर्माण झालेले दुखणे अगदी हाडाचा कॅन्सर व टी.बी. होण्याकडे झुकते...आणि सर्वकाही गमावल्याची भावना मनात उमटते. पण जिथे अंधार असतो तिथे बापू आशेचा किरण घेऊन स्वत: उभा असतो. दृढ विश्‍वास आणि गुरुक्षेत्रम्ची उदी आपला प्रभाव दाखवतेच आणि पुन्हा रिपोर्ट  काढल्यावर फक्त टी.बी.वर निभावते. प्रारब्धाचे बीज बापूच्या चरणी अर्पण करूनी धन्य व्हावे...
- पंकजसिंह माळी, जळगांव

मी पंकजसिंह माळी. मला व माझ्या कुटुंबियांना प्रारब्धानुसार जे जे उचित आहे ते माझ्या बापूंनी वेळोवेळी दिले. त्यातील सर्वात जबरदस्त अनुभव मी आपल्या समोर मांडत आहे.

माझा भाऊ रविंद्र हा फेब्रुवारी २०१२ मध्ये घरात जमिनीवर सांडलेल्या चहावरून घसरून खाली पडला. मुका मार चांगलाच लागला, पण त्याकडे दुर्लक्ष करून मित्रांसोबत बाहेरगावी फिरायला गेला. तिथून आल्यानंतर त्याचा पाय आणि कंबर दुखण्यास सुरुवात झाली.

आम्ही त्याच्यावर भुसावळ येथील ऑर्थो-सर्जनच्या वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार केला. परंतु त्रास कमी न होता वाढतच होता. २ महिने असेच गेले. त्यानंतर उपासना केंद्रात चर्चा झाल्यावर केंद्रातील एका बापूभक्ताने मला जळगांव येथील एका डॉक्टरकडे जाण्यासंबंधी सुचविले. त्याप्रमाणे मी त्याला २ मे ला त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनी सुचविल्यानुसार भावाचा एम.आर.आय आणि इतर रक्ताच्या टेस्ट केल्या. त्याचा रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की पाठीचे काही मणके काळे पडले असून खराब व निकामी झाले आहेत.

मग डॉक्टरांनी त्याच्या मणक्याच्या हाडाचा तुकडा घेऊन तो तपासणीसाठी मुंबईला पाठविला. त्याचवेळी डॉक्टरांनी सांगितले की त्याला हाडाचा कॅन्सर किंवा टी.बी असण्याची शक्यता आहे; आपण रिपोर्ट येण्याची वाट पाहू.

आम्ही परमपूज्य बापूंची आराधना करण्यास सुरूवात केली. कारण माझा भाऊ कुठल्याच आजारास आर्थिक परिस्थितीमुळे तोंड देऊ शकत नव्हता. त्यास ३ व ५ वर्षाची अशी दोन लहान मुलं आहेत. तो हातमजुरी करून आपला चरितार्थ चालवत असे.

मुंबईहून रिपोर्ट आला. त्यात कॅन्सर व हाडाचा टी. बी. असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी टी.बी. ची ट्रीटमेंट सुरू केली. परंतु ५/६ दिवसांनी त्याला जास्त त्रास सुरू झाला. तिथे मुंबईतील एक कॅन्सरतज्ञ डॉ.बढे आले होते. त्यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली.

मी बापूंचा धावा करत होतो - ‘हे सद्‌गुरुराया, यातून तुला जे योग्य वाटेल तो निर्णय तू मला दे.’

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी भावास २४ मे ला मुंबईला पॅड स्कॅनिंगसाठी घेऊन गेलो. दुसर्‍या दिवशी पॅड स्कॅनिंग केले. त्याचा रिपोर्ट बघून डॉक्टरांनी त्याला कॅन्सर असल्याचे सांगितले व तो कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, तेदेखील समजावून सांगितले.

हे ऐकून मी खचून गेलो. पण मी बापूंचा धावा करणे काही सोडले नाही. तसाच बहिणीकडे बापूंच्या उपासनेला बसलो. डॉक्टरांनी मणक्याची बायोप्सी करण्यासाठी २८ तारखेला सकाळी बोलावले. बायोप्सीचा रिपोर्ट येण्यास ५/६ दिवस लागले. या दिवसात भावाला रोज सकाळ-संध्याकाळ संस्थेची उदी देत होतो कारण आता तो अनिरुद्धच आमचा त्राता होता.

२ जून रोजी बायोप्सीचे रिपोर्ट मिळाले. तेव्हा आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्रातील एक सह-श्रद्धावान रमेशसिंह सपकाळ यांनी मला हॅप्पी होमला जाऊन डॉ. सुचितदादांना रिपोर्ट दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी हॅपी होमला आलो परंतु क्लिनिकची वेळ होऊन गेली असल्यामुळे सुचितदादांना भेटता आले नाही. हताश होऊन मी श्री गुरुक्षेत्रम् मधून संस्थेची उदी घेऊन निघालो. पण माझ्या मनात ठाम विश्‍वास होता की बापू आमच्या पाठीशी आहेत आणि तेच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील.

तेवढ्यात मला काय वाटले कोण जाणे, मी पूर्वी आमच्या डॉक्टरांकडे भेट झालेल्या डॉ. बढे यांना फोन केला व त्यांची भेटण्याची वेळ घेऊन त्यांना रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट पाहताच त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण रिपोर्ट मध्ये भावाला झालेला रोग हा कॅन्सर नसून हाडाचा टी.बी. असल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉक्टरांचे शब्द ऐकताना माझ्या मनातील आनंद ओसंडून वाहत होता व डॉक्टरांच्या मुखातून बापूच बोलताहेत असे मला वाटू लागले. भावाला जीवघेणा कॅन्सर झालेला नसल्याचे निष्पन्न होणे, तिथेच अर्धी लढाई बापूंनी जिंकून दिली होती. आता राहिला हाडाचा टी.बी., तो बरा होऊ शकणारा रोग होता.

बापूंच्या कृपेमुळे कॅन्सर ऐवजी टी.बी. वर निभावले. माझ्या बापूरायाने माझ्या भावाला असाध्य रोगातून वाचवून त्याऐवजी बरा होऊ शकणारा आजार दिला.

॥ हरि ॐ ॥

0 comments:

Post a Comment