Monday 28 August 2017

Posted by samirsinh dattopadhye on 01:28 No comments
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Jalgaon
सुभाषसिंह भारतिया, जळगाव  यांना आलेला बापूंचा अनुभव 


खोल नदीवरील अरुंद पुलावरून मोटरसायकलवरून चाललेला श्रद्धावान व मागून सुसाट वेगाने येणारी गाडी....ह्या गाड्यांमधील अंतर झपाट्याने कमी कमी होत आता फक्त पाच फुटांवर आले आहे. जीवन व मरण ह्यांमधील अंतर केवळ पाच फूट....पण हे अंतर सद्गुरुंच्या छत्रछायेखाली असणार्‍या श्रद्धावानाला ‘जीवना’च्या दिशेने खेचण्यास पुरेसे असते!
- सुभाषसिंह भारतिया, जळगाव 

माझा बापू माझ्यासाठी धावत येतोच, नव्हे तर तो सदैव माझ्याबरोबरच असतो. माझा बापू सोबतीला माझ्या बरोबरच आहे ह्याचे अनुभव मला पदोपदी येत आहेत. मला १९९८ अगोदर एकंदर ७ असे मोठे अपघात झाले परंतु सुदैवाने परमेश्वरी कृपेने काही एक झाले नाही. मी नेहमी बचावलो. मला काहीही झाले नाही. २००१ पासून मी अनिरुद्ध उपासना केंद्र-जळगाव येथे दर शनिवारी बापूंच्या उपासनेकरिता जाऊ लागलो. तेव्हांपासून माझ्या जीवनात फक्त बापूच; दुसरा कोणीही नाही. मी बापूंना फक्त एवढेच सांगतो, बापू मला सांभाळून घ्या, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही.

सन २००६ ची गोष्ट. मी त्यावेळी औषध कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून पाच जिल्ह्यांमध्ये काम करीत होतो. माझा मुक्काम औरंगाबाद येथे होता व तेथून आम्हाला माझ्या सहकार्‍याबरोबर (रिप्रेझेंटेटीवबरोबर) जालन्याला कामाला जायचे होते. सकाळीच माझा रिप्रेझेंटेटीव सचिन मोटरसायकल घेऊन मला घ्यायला आला व म्हणाला, ‘‘साहेब, मोटरसायकलवर जाऊन येऊ जालन्याला.’’ मी म्हणालो, ‘‘कशाला रिस्क घेतोस? आपण बसने जाऊन येऊ.’’ परंतु त्याच्या विनंतीला मी काही नाकारू शकलो नाही व आम्ही पेट्रोल भरून ४५ च्या स्पीडने हळूहळू बोलत बोलत निघालो.

मी रस्त्यात त्याला बापूंविषयीच्या गोष्टी ऐकवत होतो. केंद्रात बापूंच्या ज्या प्रवचनाची सीडी ऐकली त्याचा थोडासा सारांश वगैरे वगैरे ऐकवला.

बोलण्याबोलण्यात आम्ही ३ कि.मी. अंतर केव्हा पार केले ते कळलेच नाही. ह्या ठिकाणी एक वळण होते व एक नदी लागली. नदीच्या पुलावरून आम्ही जाऊ लागलो. आमच्या पुढे एक बैलगाडी व त्याच्या पुढे एक ट्रॅक्टर असे हळूहळू जात होते. पुल जास्त रुंद नव्हता, त्यामुळे ओव्हरटेक न करता हळूहळू मागून जाणंच आम्ही पसंत केलं. 

आम्ही पुलाच्या मध्येपर्यंत पोहोचत नाही, तेवढ्यात मागून रस्ता मोकळा असल्यामुळे एक रिकामी अ‍ॅम्बॅसेडर इतक्या वेगाने वळणावर आली की ती आम्हाला ओव्हरटेक करून पुढे निघून जाईल असेच आम्हाला वाटले. अर्थात आमची बाईक असल्याने आम्हाला त्या गाडीच्या ड्रायव्हरने ओव्हरटेक केले तरी पुलाच्या अपुर्‍या रुंदीमुळे पुढील बैलगाडी व ट्रॅक्टर ह्यांना ओव्हरटेक करणे त्याला जमले असते की नाही देव जाणे. आमच्यातील अंतर कमी होत होत आता आमच्यापासून ती गाडी फक्त ५ फुटांवर आली. 

आता आम्हाला वाटले की ती आम्हाला ओव्हरटेक करणार, तेवढ्यात एकदम जोराचा आवाज झाला आणि त्याची गाडी खाडकन जागीच बंद पडली. त्या विचित्र भयंकर आवाजाने आम्ही खूपच घाबरलो. कसला आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिले तर त्या बंद पडलेल्या गाडीचा ड्रायव्हर घाबरून बाहेर येऊन पाहत होता की नक्की त्याच्या गाडीला काय झाले? 

तोही खूप घाबरला होता कारण एक भयानक अपघात होता होता टळला होता. त्याचवेळेस सचिन ओरडला, ‘‘साहेब तुमच्याबरोबर बापू होते म्हणून आपण वाचलो; नाहीतर आज सरळ आपण मोटरसायकलसकट पुलावरून खोल नदीत पडलो असतो. आपले काय झाले असते देवच जाणे.’’  

कदाचित आम्ही दोघेही वाचलोच नसतो. मी कुठेही गेलो तरी माझ्या वरच्या खिशामध्ये आपल्या संस्थेची उदी असलेले व बापूंचा फोटो असलेले पेन नेहमी असते. माझा बापू माझ्या सोबत असल्याची जाणीव मला त्यामुळे कायम जागृत राहते. श्रद्धावानांचे सुरक्षाकवच असणार्‍या त्या माझ्या बापूनेच बसल्या जागी काहीतरी चक्रं फिरवली आणि आमच्यावर वेगाने आदळण्याच्या बेतात असलेली ती गाडी जागीच बंद पाडली.

पुढे मी रिटायर व्हायच्या एक वर्ष आधीच कंपनी सोडली व आता जळगाव येथे वकील म्हणून प्रॅक्टीस करतो. माझा बापू सदैव माझ्या बरोबर आहे....नेहमीच असतो व मला ह्या वयातही चैतन्यमय ठेवतो, हे मला रोजच्या रोज अनुभवास येते. माझे सहकारी आजही मला सांगतात की ‘तू कुठून एवढी एनर्जी आणतोस? इतक्या उत्साहाने कुठलेही काम कसे काय करतोस?’ बस्स! त्यांना मला एवढेच म्हणायचे आहे की माझा बापू माझ्याबरोबर सदैव राहतो व तोच माझ्याकडून चांगली कामे करवून घेतो व माझ्यातल्या ऊर्जेचाही तोच स्रोत आहे. ही बापूंचीच माझ्यावर कृपा !!

॥ हरि ॐ ॥

0 comments:

Post a Comment