Thursday 31 August 2017

Posted by samirsinh dattopadhye on 02:36 No comments
Anubhav-kathan-Aniruddhabapu-Dhule

विजेच्या तारांना चिकटल्यामुळे ह्या बापुभक्ताच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता, त्यामुळे अगदी शेजारील खोलीतील व्यक्तीलाही तो संकटात असल्याची कल्पना येणं शक्य नव्हतं....
....पण इतर कोणाहीपर्यंत पोहोचू न शकणारा आवाज शेकडो मैल अंतरावर असणार्‍या त्याच्या सद्गुरुंपर्यंत - बापूंपर्यंत पोहोचलाच....कसा?
- एन. एन. सोनगीरकर, धुळे

आम्ही बापूपरिवारात २००१ पासून आलो. त्यापूर्वी बापू कोण हेदेखील माहीत नव्हते. त्याआधीही जीवन सुरूच होते, पण बापूंकडे आल्यानंतर आम्ही काय ‘मिस’ करत होतो ते कळले.

आमचा फोटो स्टुडिओ असल्याने आमच्याकडे तसे लोकांचे येणे-जाणे भरपूर होते. असाच एकदा एक सुमारे १५ वर्षांचा मुलगा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर येत होता. तो बापूभक्त होता. तो आम्हाला बापूंच्या गोष्टी कथन करायचा. त्याच्या जवळ उदी असणारे बापूंचे पेनही होते. आल्यावर तो त्या पेनमधील उदी आम्हाला द्यायचा. त्याच्या गोष्टी ऐकताना नेहमी बापूंबद्दल उत्सुकता वाटत असे की कसे असतील हे बापू? त्यातच धुळ्याला एकदा एका बापुभक्तांचे ‘अनिरुद्ध महिमा’ वर प्रवचन होते. ते ऐकायला या म्हणून ह्या मुलाने हट्टच धरला व आम्ही ऐकण्यासाठी गेलो.

....आणि तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस ठरला. अनिरुद्धमहिमा ऐकल्यावर मनाला ओढ निर्माण झाली. त्यावेळेसच आम्ही ठरविले की अनिरुद्ध उपासना केंद्रात आता ह्यापुढे दर शनिवारी जायचेच जायचे.

त्यावेळेस आमच्याजवळील अनिरुद्ध उपासना केंद्र राणाप्रताप हायस्कूल, धुळे येथे भरायचे. गेल्या गेल्या तेथील शांत भक्तिमय वातावरण बघून व शिस्तीत काम करणार्‍या सेवाभावी कार्यकर्त्यांना बघूनच मन प्रसन्न झाले. केंद्रात उपासना झाल्यावर होणार्‍या आरत्या करण्याची संधी ह्या उपासनेसाठी जमलेल्या श्रद्धावानांना आळीपाळीने मिळत असते. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही केंद्रात गेल्यागेल्याच मला व माझी पत्नी सौ. कल्याणीला नंदाआईची आरती जोडीने करायला मिळाली.

ह्या आरतीचे स्पंदन इतके जबरदस्त होते की मला अक्षरशः गहिवरून आले. आरती होईपर्यंत आनंदाश्रू वाहत होते.

त्यापुढे दिवसेंदिवस आमचा प्रवास बापूमय होत गेला. अनेक अनुभव आले. पण २००६ साली माझ्यावर जो जिवावरचा कठीण प्रसंग आला, त्यातून माझ्या बापूरायाने मला सुखरूप बाहेर काढले.

त्याचे झाले असे - आम्ही नवीन घराच्या शोधात होतो. रोज बापूंचे नामस्मरण करीत शोध घेत होतो. बापूकृपेने 2006 च्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला प्लॉट मिळाला. बापुकृपेने बँकेचे लोनही अवघ्या आठ दिवसांतच प्राप्त झाले. त्यामुळे त्याचे बांधकामही लगेचच सुरू झाले. बांधकामादरम्यान पाणी मारण्यास मीच जायचो. 

तशातच २००७ चा फेब्रुवारी महिना उजाडला. त्या वर्षी १८ फेब्रुवारीला बापू धुळे येथे येणार होते. त्याच्या सुमारे आठेक दिवस आधी मी असाच पाणी मारण्यासाठी प्लॉटवर निघालो. माझा मुलगा दिवसभर स्टुडिओ सांभाळत असे, त्यामुळे तो सकाळी कधी माझ्याबरोबर येऊ शकत नसे. मात्र त्या दिवशी कसा कोण जाणे, तो माझ्या सोबतच आला. त्याचे नाव आहे अचिकेत, मात्र योगायोगाने आम्ही त्याला त्याच्या जन्मापासून ‘बापू’च हाक मारतो आणि मोठ्या मुलाला ‘दादा’ म्हणत असो.

तर अचिकेत माझ्या सोबत आला. प्लॉटवर आल्यावर आम्ही विहिरीवरील मोटर चालू केली व बांधकामाला पाणी मारायला सुरुवात केली. तेवढ्यात मुलाचे लक्ष, पंपाची वायर तिथेच जमिनीवर लोळत होती, तिथे गेले. येताजाताना त्या वायरमध्ये माझा पाय अडकून पडायला होईल म्हणून त्याने ती बाजूला करून ठेवण्यास सुचवले व तो पुढील हॉलमध्ये गेला. 

त्याने सांगितल्याप्रमाणे मी वायर बाजूला करण्यासाठी उचलली मात्र....
....आणि कहर झाला! 

बांधकामांमधल्या सततच्या वापरामुळे काही ठिकाणी वायरचे इन्सुलेशन जाऊन आतील तांब्याच्या तारा बाहेर आल्या होत्या व हे माझ्या लक्षात न आल्याने बाजूला करण्यासाठी घेतलेली वायर माझ्या हाताला घट्ट चिकटली व इलेक्ट्रिक सप्लाय चालूच असल्याने जबरदस्त करंट लागला.

एका हातात पाण्याचा पाईप, पाणी चालू, कपडे ओले, बुटात पाणी अशा अवस्थेत सारखा विद्युत प्रवाह चालू असल्याने मी मरणप्राय यातना भोगत होतो.

आता माझे काही खरे नाही व अंत हा ठरलेलाच असे मनात वाटत होते. तरी मनातून बापूरायाचे स्मरण, जप चालू होता. १०-१२ सेकंद तरी हे चालू असेल, तोपर्यंत माझा आवाज फुटत नव्हता. तोपर्यंत मला घट्ट चिकटलेली वायर माझा जीव घेऊ पाहत होती.

माझा मुलगा तर शेजारच्या खोलीत होता व माझ्या तोंडातून काही केल्या आवाज फुटत नव्हता. आता केवळ बापूच काही करू शकणार होते! आणि त्यांनीच ते केले!

कारण तेवढ्यात कसा कोण जाणे, पण जवळील लाकडी दरवाजाच्या चौकटीला माझा हात लागला आणि तेवढ्यातच माझा आवाज फुटला व मी अचिकेतला जोराने हांक मारु लागलो - ‘बापू बापू बापू रे’. विचित्र स्वरातील माझे ओरडणे ऐकून तो पुढील हॉलमधून धावतच आला व एकंदरीत प्रसंग पाहून त्याने त्वरेने धावत जाऊन पॉवरसप्लायचे बटण बंद केले व नंतर माझ्या हातातील वायर दूर केली. माझ्या हाताला विद्युत प्रवाहामुळे मोठी जखम झाली होती, पण जीव तर वाचला होता!

मी मनात म्हणालो, ‘सद्गुरू बापुराया, मी केवळ तुझ्याच कृपेने वाचलो. तूच मला हे नवीन जीवदान दिलेस. एरवी कधी सकाळी माझ्याबरोबर न येणार्‍या माझ्या मुलाला माझ्यासोबत यायची बुद्धीदेखील तूच दिलीस. भयानक करंट लागल्यामुळे बंद पडलेला आवाजही तूच माझा त्या लाकडी चौकटीला स्पर्श करून चालू केलास. म्हणूनच माझा मुलगा वेळेवर येऊन मला वाचवू शकला. 

किती धावतोस रे तू बापूराया !

‘मी माझ्या भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला ।
प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हाकेला देतसे ॥

ह्या ओवीप्रमाणेच मी हाक मारली व तू धावून आलास. मला मरणाच्या दाढेतून ओढून काढलेस. खरं तर तू माझा जणू पुनर्जन्मच केलास रे बापुराया!

॥ हरि ॐ ॥

0 comments:

Post a Comment